मी एका पालाच्या घरात जन्म घेतला. वडीलांनी मला पार्डी गावातील शाळेत शिक्षणासाठी दाखल केले. मला शिक्षणाची खूप आवड होती, पण मराठी भाषा न समजल्यामुळे शिक्षकांचे बोल पटकन समजत नव्हते. त्यामुळे पहिले वर्ष खूप संघर्षात गेले. इतर मुले लिहायला-वाचायला लागली, पण मी मराठी भाषेत कच्ची राहिले. त्यामुळे गुरुजींनी मला वरपास केले, असं तिसरीपर्यंत घडलं. चौथीत मात्र भुगोल विषयात नापास झाले आणि माझे औपचारिक शिक्षण थांबले.
वडील आणि गुरुजींनी शिक्षण अधिकाऱ्यांकडून पेपर पुन्हा तपासले, पण अक्षर नीट नसल्यामुळे मी पास होऊ शकले नाही. मला खूप दुःख झालं. अधिकारी व्हायचं स्वप्न अधुरं राहिलं. मी अवघी १६ वर्षांची असताना माझं लग्न युवराज पवार यांच्याशी झालं. ते दहावीत होते. मी त्यांचं शिक्षण चालू राहावं म्हणून घरचे पैसे लपवून त्यांना देत असे. स्वतःला शिक्षण मिळालं नाही, पण त्यांनी चांगलं शिकावं, असं वाटायचं.
पती समाजकार्य करत होते. मला दोन मुले झाली. माझं अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं, पण मी निश्चय केला की माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत. मी त्यांच्यावर भरपूर खर्च केला आणि त्यांना सायन्समधून शिकवलं. एक इंजिनिअर आणि एक B.Sc. Agri झालं.
पण इथेच समाधान मिळालं नाही. माझ्यासारखी अनेक मुले-मुली मराठी भाषेच्या अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहत आहेत. म्हणून मी माझ्या पतीसमोर शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन अडचणी होत्या - निधी आणि जागा. मी माझ्या ताब्यातील ४ हेक्टर जमीन समाजासाठी देण्याचा निर्णय घेतला.
त्या जमिनीवर निवासी आश्रम शाळा उभारली. पाणी, वीज, शेड यासारख्या सुविधा दिल्या. घरची मुलं डोळ्यांसमोर शिकली तशीच फुटपाथवरची, अनाथ, बेसहारा मुले शिकली पाहिजेत, हा माझा निर्धार आहे. आता आमचं वैयक्तिक वारस नसला तरी शेकडो मुलांची मी आई आहे.
अधश्रद्धेवर माझा कट्टर विरोध आहे. बाटप्रथा अजूनही आहे. महिलांना तुच्छ लेखले जाते. पण नवीन पिढी शिकली तर समाज नक्कीच बदलेल, असा माझा विश्वास आहे. संस्कार आणि शिक्षण यांच्या माध्यमातून मुलांना सत्य-असत्याची ओळख करून देऊन देशसेवेसाठी तयार करायचं आहे.
अज्ञान अधोगती, शिक्षण प्रगती!
– सौ. रत्नाताई युवराज पवार, वरदडा (बुलढाणा), महाराष्ट्र
माझ्या जिवनातील कार्याची खरी हकीकत आपले समोर मांडत आहे. मी १९९७ मध्ये १२ वी पास झालो आणि मला नानाभाऊ कोकरे येथे विनाअनुदानित आदिवासी आश्रमशाळा पिंपळगाव राजा येथे नेण्यात आले. २ वर्षे आश्रम शाळा चालवली आणि माझे फासेपारध्यांची मुलेही एकत्र करुन अध्यक्ष निना कोकरे यांनी मला शाळेवरुन काढून टाकले कारण रितसर मी मुख्याध्यापक होवून संस्थेमध्ये भागीदार होवू शकतो. त्यानंतर घरी आल्यावर काही दिवस बेरोजगार होवून मोलमजूरी केली. त्यानंतर हिवरा आश्रम येथे यात्रेदरम्यान मणीमाळा विक्री करीत असतांना भैय्युजी महाराज इंदोर यांनी आदिवासी शाळा काढायची म्हणून मला यात्रेमधून इंदोर येथे घेवून गेले आणि तेथे मी समाजातील २५० विद्यार्थ्यांची यादी तयार केली. मुले सुध्दा बोलावून घेतले व मला काही जमणार नाही म्हणून तेथून सुध्दा काढून टाकले. त्यानंतर २००५ मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधिक्षक श्री कृष्णप्रकाश प्रसाद साहेब आले आणि प्रत्यक्ष भेटीत हिवरा आश्रम येथे फासे पारधी समाजाचा मेळावा घेण्याचे ठरवले आणि मेळावा सुध्दा झाला.
त्यामध्ये बुलडाणा फासे पारध्यांचे पुनर्वसन करणार असे सरांनी जाहीर केले आणि सतत दोन वर्षे एक पीएसआय तीन कॉस्टेबल आणि पोलीस जीप घेवून रात्रंदिवस बुलडाणा जिल्ह्यातील फासे पारधी यांचा सर्वे करुन तत्कालीन गृहमंत्री श्री आर. आर. पाटील यांना पोहचवला. तेव्हा त्यांनी पारधी पॅकेज जाहीर करुन ३० कोटी निधी महाराष्ट्रमध्ये पारधी पॅकेजला दिला तो इतरांनी लाभ घेतला आणि आमचे फासेपारधी लोकांकडे कागदोपत्री पुरावे नसल्याने कुणालाही त्याचा लाभ मिळाला नाही आणि तिसऱ्या वर्षी सर्व ५०% कागदपत्रे पुरावे मिळवले तर निधी संपला होता.
अशा अवस्थेत श्री कृष्णप्रकाश सरांची बदली झाली आणि आम्ही निराधार झालो. परंतु समाजसेवेचे व्रत सोडले नाही. इमानदारी सोडली नाही. इतरांना लुबाडले नाही. त्यामुळे टिकून होतो. समाजाचा सेवेचा अनुभव जवळ असल्याने तहसिल कोर्ट, पंचायत समिती, आदिवासी कार्यालय अकोला, एस.डी.ओ. कोर्ट जिल्हाधिकारी कार्यालय, पो. स्टेशन आदि ठिकाणी फासेपारधी समाजातील लोकांना योजना, कागदपत्रे, मेळावे, उपोषण, बिन्हाड आंदोलन सुरु ठेवले आणि सर्वांचा लेखाजोखा केल्यानंतर समाजाकडे पाहिल्यावर असे निदर्शनास आले की ५०% लोक देशातील विविध मोठ्या शहरात आपले मुलबाळ घेवून कुटूंबासहीत निघून जातात. २५% लोक शासकीय जमीनीवर गावाबाहेर दूर अंतरावर अतिक्रमण करुन शेती करतात. १५% लोक शिकार व्यवसाय करतात आणि १०% लोक पोलीस कारवाईत अडकतात आणि वाईट प्रवृत्तीकडे वळतात. शिक्षणाला महत्व देत नाही. आपले मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी आग्रह करीत नाही. उदा. वडील शिकार करीत असेल तर मुलगा शिकारी बनतो. वडील भिक्षा मागत असेल तर मुलाला भिक्षा मागायला लावतात आणि वडील जर गुन्हेगारी करीत असेल तर मुलांना त्याप्रमाणे शिकवले जाते.
अशा प्रमाणे शेकडो मुले मुली वाईट प्रवृत्तीकडे वळतात आणि पोलीस कारवायीत पिळल्या जातात. इतर शाळेत या मुला मुलींना मुले चिडवतात. यांचेकडे आपुलकीने कोणी लक्ष देत नाही. मराठी भाषा त्यांना वर्षभर समजत नाही. नैराश्य येवून मुले शाळा सोडतात. त्यांचे आईवडीलांची अशी भावना तयार होते की, आपले मुलेमुली कुठे नोकरीला लागणार आहे. यांचेकडे कुणी लक्ष देत नाही. याचे सर्व मूळ कारण आमचे श्रीकृष्ण कृपा बहु. फासे पारधी समाज विकास संस्थेने शोधले आणि मागील वर्षापासून समशेरसिंग पारधी आदिवासी आश्रमशाळा वरील संस्थेअंतर्गत सुरु केली. कारण आमचे समाजाचा कोणी वाली नाही, कुणी पुढारी नाही किंवा नेता नाही. वर्षानुवर्षे आमचे समाजाचे मुलेमुली शेकडो प्रमाणात गुन्हेगारीच्या चक्रात पिळले जात आहे, याची कुणीच कदर करीत नाही. कुणालाही याची दया येत नाही म्हणून या समाजातील त्यांचे रक्ताचे समाज सेवक म्हणून प्रचंड आत्मविश्वासाने वरील आदिवासी आश्रम शाळा सुरु केली. यामध्ये आजरोजी १०० च्यावर विद्यार्थी दाखल आहे व प्रस्ताव शासन स्तरावर मंत्रालयात दाखल आहे.
– युवराज रामसिंह पंवार, वरदडा (बुलढाणा), महाराष्ट्र
भारतीय भविष्य आपल्या मुलांवर अवलंबून आहे. आणि त्यांचं भविष्य तुमच्यावर अवलंबून आहे.